Saturday, June 03, 2006

प्रसन्न सकाळ

सकाळच्या वेळी बाहेर एक फेरफटका मारणे मला आवडते. वातावरणात चैतन्याचा प्रवेश होत असतो. सूर्योदय होत असेल तर गच्चीत जाऊन ऊगवत्या सूर्याचे लालचुटुक बिंब बघुन मग मी बाहेर पडतो. दूधवाले, पेपरवाले लगबगीने कामाची सुरुवात करत असतात.

वातावरणात गारवा असेल तर अमृततुल्य चहा पिण्याचा मोह मला आवरत नाही. मधुनच एखादे सुखोई विमान आसमंतात विजेच्या कडकडाटासारखा आवाज करुन वेगात जाते. सकाळच्या वेळचे एक सुंदर दृश्य म्हणजे शाळेत जाणारी मुले. लहानलहान चिमुरडी लवकर तयार होऊन school bus ची वाट पहात असतात. त्यांचा उत्साह पाहून आनंद वाटतो. नाहीतर आपण- ऑफिसला आरामात जाण्याच्या बेतात असतो.


रोजच्या या दिनचर्येत कमालीचे साम्य असते. तोच पेपरचा गठ्ठा बांधणारा पेपरवाला, तीच चहाची चव, तोच रोजचा उत्साह. पण मनात मात्र रोज नवनवे विचार. रोज नवे संकल्प, रोज नव्या आशा. या आयुष्याच्या नविन्यात एक विलक्षण सुख आहे. ते सुख मी रोज चहाच्या घुटक्यांबरोबर पितो, पावलोपावली अनुभवतो. अगदी या गीतासारखे- "सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे".

गेले काही महिने ही दिनचर्या सुखात चालली होती. आता 'नेमेची येतो' त्या पावसाने त्यात बदल आणले आहेत. असो. तरीही पाण्याच्या धारांकडे गॅलरीतून पाहत मी रोज नवनवे संकल्प करतो.

"मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।"

3 comments:

Akira said...

Hi Milind...Lovely pictures....

Keep writing...

Milind said...

dhanyavaad, Akira!

Anonymous said...

are yaar its too good. sahi aahe keep it up.
--Nilesh