Saturday, July 01, 2006

कविता कधी सुचते?

कविता किंवा चारोळी करणाऱ्यांची याबाबत विविध मते असतील.

काही कवी एखाद्या शिल्पकाराप्रमाणे कवितेस विविध भावनांनी आणि शब्दांनी कलाकुसरीने सजवून रचत असतील. मी आपला साध्यासुध्या कविता करणारा हौशी कवी.

मनमोराचा पिसारा जेव्हा फुलून येतो, त्यावेळच्या भावनांचे मोरपीस जपून ठेवावेसे वाटते. मनातल्या काही खास विचारांना कवितेचं स्वरूप देणं म्हणजे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणं असं मला वाटतं. ते विचार लक्षात ठेवणं, आचरणांत आणणं महत्वाचं आहेच, पण कवितेच्या मालेत ते शब्द गुंफले की त्यांच्या सौंदर्यात जी भर पडते ती काही औरच.

आता कवितेमागची प्रेरणा कुठली? प्रेम, जीवनप्रेम, देशभक्ती अशा अनेक प्रभावी विचारांचा झरा त्यामागे असू शकतो. उदाहरणार्थ, उमलत्या वयातल्या उमलत्या प्रेमामुळे हृदयात प्रेमकविता उमलली नाही तर नवलच. प्रेमभंगही कविता सुचवू शकतो. प्रा. अत्रेंची 'प्रेमाचा गुलकंद' वाचली आहे की नाही? :)

एखादे सुंदर दृश्य, एवढेच काय रोजच्या साध्या घटनांवरही कविता सुचू शकते. पण पावसामुळे मला तरी अजून कविता सुचलेली नाही. कित्येकवेळा मी पावसाला वेगवेगळ्या प्रकारे पाहिले, अनुभवले, पण व्यर्थ. मग मनाची समजूत काढण्यासाठी मी निष्कर्ष काढला आहे की त्यावेळी खमंग भजी खाण्याच्या मनात येणाऱ्या तीव्र इच्छेमुळे आणि पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांच्या गोंगाटामुळे कवितेचे शब्द ऐकू येत नसावेत.

जीवनात कितीही धकाधकीचे, कोलाहलाचे प्रसंग आले तरी त्यानंतरही कविता सुचण्याची कला मनाच्या निवासात कायम राहावी असं मला वाटतं. मी केलेल्या काही हलक्या फुलक्या कविता लवकरच येथे प्रकाशित करेन.

आता हे झालं माझ्या बाबतीत. कवितेच्या बाबतीत वाचकांची काय मते आहेत?

3 comments:

Anonymous said...

"मनातल्या काही खास विचारांना कवितेचं स्वरूप देणं म्हणजे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणं असं मला वाटतं. ते विचार लक्षात ठेवणं, आचरणांत आणणं महत्वाचं आहेच, पण कवितेच्या मालेत ते शब्द गुंफले की त्यांच्या सौंदर्यात जी भर पडते ती काही औरच."

निव्वळ अप्रतिम!

Priyabhashini said...

Agdi manatale lihilay.

Past few days I'd had similar thoughts in my mind. Somewhat negative thoughts.

Somehow I am not getting time to put them down. Let see!

Milind said...

शैलेश आणि Priyabhashini, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.