पणतीचा पण
कधी कधी आपल्याला भविष्याच्या चिंतेमुळे अंधारलेले वाटत असते. अशावेळी वर्तमानाकडे दुर्लक्ष होऊ न देणे जरूरी असते. किंबहुना वर्तमानातील प्रयत्नच भविष्यावर प्रकाश पाडतात.
आणि कधी कधी आपण एखादे लक्ष्य गाठतो, पण पुढचे लक्ष्य ठरवलेले नसते. जरा विचित्र स्थिती असते ही. नुकत्याच मिळवलेल्या विजयामुळे तुम्ही आनंदी असताच, पण त्याचबरोबर पुढच्या मार्गाच्या पक्क्या कल्पनेचा अभावही त्रासदायक असतो. अशाच काही क्षणांत सुचलेले विचार मी जपून ठेवलेले होते. त्यांची मग एक कविता रचली.
यत्नाची पणती
अंधारलेले वाटते का सभोवतीला,
मग पेटवीन प्रयत्नांच्या पणतीला.
चमत्काराच्या प्रतीक्षेत रिते नाही बसणार ,
एकदमच आयुष्यात सूर्योदय नाही होणार.
यत्नांचे दिवे अन् दिवे लावून प्रकाश साचवेन,
जगाच्या तालास ताल धरून स्वतःला नाचवेन.
वाईटाचेही वादळवारे असतात चांगल्याच्या संगतीला,
विझण्यापासून वाचवायचेय मलाच माझ्या पणतीला.
भूतकाळाच्या सर्व शिदोरी सदैव पुरतील,
उद्याच्या विजयांची स्वप्ने उरात फुलतील
मनात जपलाय मधुर विचारांचा गुलकंद,
अन् दरवळे नव्या स्वप्नांच्या पालवीचा सुगंध
वर्तमानाच्या पानांवर यत्नांची काव्ये लिहीन,
अंधारलेले नसले तरीही विजयाची स्वप्ने पाहीन
वेडावती ध्येयाचा ध्यास अन् विजयाची प्यास
मनगटी रक्तास अन् घामास प्रयासाचा हव्यास
4 comments:
वाईटाचेही वादळवारे असतात चांगल्याच्या संगतीला,
विझण्यापासून वाचवायचेय मलाच माझ्या पणतीला.
सही!
हे मात्र नीट कळले नाही:
"अंधारलेले नसले तरीही विजयाची स्वप्ने पाहीन"
कविता मस्तच जमलिय.
भूतकाळाच्या सर्व शिदोरी सदैव पुरतील,
उद्याच्या विजयांची स्वप्ने उरात फुलतील
मनात जपलाय मधुर विचारांचा गुलकंद,
अन् दरवळे नव्या स्वप्नांच्या पालवीचा सुगंध
विशेष आवडले.
अजित,
एका विजयानंतर निष्क्रीयता येवू नये असे त्या ओळींत अभिप्रेत आहे. अजून काही समर्पक शब्द सुचले तर लिहीन.
अजित आणि शैलेश,
धन्यवाद.
मिलिंद,
कविता खूप आवडली. सगळ्याच नोंदी सुरेख आहेत, लिहीत रहा. अजून वाचायला आवडेल!
Post a Comment