दुचाकीची दुर्दशा
'भारत माझा देश आहे'हे मी जसे गर्वाने अन् आपुलकीने म्हणतो तसेच पुणे माझे आवडते शहर आहे हे ही मी म्हणत असतो.
तसा मी भारतातल्या ३ ते ४ शहरांतच थोडा काळ राहिलोय पण बहुतांश भागातल्या लोकांना भेटलो आहे. मित्रांकडूनही त्यांच्या शहराबद्दल ऐकले आहे.
प्रत्येकाच्या आवडीनिवडी, priorities नुसार त्यांचे आवडते ठिकाण वेगवेगळे असते. तसे पुणे माझे आवडते.
तसा मी वाहनगर्दीला टाळत असतो,पण डेक्कनपासून भांडारकर रोड आणि सेनापती बापट रोडवर नुकताच दुचाकीवरून पावसात प्रदीर्घ प्रवास केला आणि गेल्या ४-५ वर्षात पुण्यात किती बदल झाला आहे हे चांगलेच जाणवले.
मग मी ही एक स्वैर कविता केली:
दुचाकीची दुर्दशा
माझिया दुचाकीला कळेना
पुणेरी रस्त्यांची भाषा
माझिया अन् दुचाकीच्या
कमरेची झाली दुर्दशा
मला अन् दुचाकीलाही
खड्ड्यांचे कारण ना कळे
माझे अन् दुचाकीचेही
सांधे झाले खिळखिळे
तारेवरची कसरत बरी असते
त्यात तार तरी सरळ असते
खड्डे छोटे मोठे अन् वेडेवाकडे
पाहताच पडती पोटातही खड्डे
खाली खड्डे वरुन पाऊस
समोर ट्रॅफिक जामचा त्रास
कधी संपेल हा अमुचा सासुरवास
सासुरवास नव्हे, हा तर वनवास
एक मात्र खूप चांगले झाले
दुचाकीवरचे नियंत्रण सुधारले
तिनेही मला समजून घेतले
आजवर खाली नाही ढकलले
ती माझी अन् मी तिची
काळजी घेत असतो खास
कितीही नकोसा वाटूदे प्रवास
दिलासा देतसे तिचा सहवास
कोणी मला सांगा की (माझे वा दुचाकीचे) 'दोनाचे चार' केल्याने आयुष्यातले प्रवास सुखकर होतील की नाही?
:-)
-मिलिंद
1 comment:
कविता छान आहे...
Post a Comment